Saturday 25 August 2007

मी साधू संत जगलो

मी साधू संत जगलो, मज कोणी न विचारी का
करताच एक चोरी, सारे कुरवाळी उरी का

मी जिंकतच आलो, द्वेष करी माझा सारे
एकदा चूकून हरलो, मिरवी डोईवरी का

सुखाने ना जगू दिलं, ना दिलं मरूही
हेच ते सुखदु:खाचे, खरे वाटेकरी का

आगीवरच ना, इथे भाजतात भाकरी सारे
एकाचं धान्य श्रेष्ठ म्हणून, दूसरा भिकारी का

फुलण्या ऐवजी जळतात, कसले हे शेजारी
लाकडा ऐवजी हाडं, इथे विकतात वखारी का

एकाच घरात रंगलीय, सप्तसूरांची मैफील
मनसोक्त हसतेय नववधू, रडते म्हातारी का

फिटली सारी देणी, निवांत पडलो लाकडावरी
पेटलो नाही मी, तुझ्या अश्रूंची बाकी उधारी का

किती पीडा या धरतीवर, कोण धावणार मदतीला
पांडुरंगा युगानयुग का, उभाच राहणार विटेवरी का

प्रत्येकाच्या कवितेनं, फुलतो इथे नवा वसंत
आपआपसात उपसतात, शब्दांच्या तलवारी का

हा प्रांत मायावी, ना दया इथे जराही
मी तिष्ठतं उभा, जीव गुदमरतो शहरी का

@सनिल पांगे

No comments: