Saturday 8 October 2016

जे मन ठरवते अगदी तसेच कुठे घडते रे
वास्तवाची अळी, स्वप्नाचे पान कुऱतडते रे
ध्येयाचा रस्ता जरी, सरळ, साधा सोप्पा
भाग्याचे पाऊल उलटे ते उलटेच पडते रे
हास्यावर ना दावा, ना अधिकार कोणाचा
एका आघाताने अश्रूंच्या जात्यात भरडते रे
किती ऊंची गाठलीस आता पडण्याची भीती
त्यापेक्षा जमनीवर राहणे खरेच परवडते रे
जिंकले सारे जग, न जिंकता आले स्वतःस
श्वास असे पर्यंतच हृद्याचे जग धडधडते रे
श्रद्धा असावी अपार स्वतः केलेल्या भक्तीवर
विश्वास दगड नसता, दगडाचे दार उघडते रे
सांग का करावा हट्ट चंद्र, सुर्य नि तारांचा
चमक तशी इवल्या काजव्यातही सापडते रे
श्रीमंतीच्या जोरावर किती गरीबांना पेटवलेस
शेवटी तुझेही शरीर अग्नी पाशीच अडते रे
@ सनिल पांगे

No comments: