Monday 27 August 2007

प्रेयसीची कुंकवाने सजते ललाट

आयुष्याच्या प्रवाहा मध्ये
क्षणाक्षणाला माणसं भेटतात
काही फक्त विसरण्यासाठीच
काही भेटल्यासारखी वाटतात

काही थोड्या अधिक कालांतराने
आठवणींच्या पकडीतून सुटतात
काही प्रदिर्घ कालांतराने
नकळत स्मरणातून मिटतात

अचानक एखादी व्यक्ती भेटते
जिच्याशी मैत्री करावीशी वाटते
आयुष्याच्या प्रत्येक समयी
तिची सोबत हवी हवीशी वाटते

आठवणींच्या वेलीवर तेव्हा जास्त
तीचीच फुलं फुलू लागतात
रात्रभर मग तिच्या स्वप्नांच्या
हिंदोळ्यावर झोके झुलू लागतात

कधी कधी तर स्वप्न चक्क
दिवसा येऊन बोलू लागतात
हास्याची इवली इवली फुलं
चेहऱ्यावर अवेळी डोलू लागतात

मग सुरू होतो भेटी गाठीचा
हवाहवासा वाटणारा खेळ सारा
ग्रीष्म, धगधगत्या पळत्या जिवावर
बरसतात मग काही शीतल गारा

स्वप्नांच्या हळव्या सुर्यकिरणांची
इथूनच सुरू होते कोवळी पहाट
आप्तेष्टांच्या झेलून अक्षतांच्या चांदण्या
प्रेयसीची कुंकवाने सजते ललाट

@सनिल पांगे

1 comment:

अरविंद said...

Sanil...

..chhaan kavita